बोराखेडीतली “रामनवमी”

काही विशेष दिवस असला  की  मन बोराखेडीला फेरफटका मारून  आल्याशिवाय राहत नाही . त्यात रामनवमी म्हणजे   अगदीच जिव्हाळ्याचा दिवस !!!!  का त्याचं एवढ अप्रूप असाव तर त्याची  कारणं  ही तशीच. बाल्यावस्थेत सणावारांचे इतके दृढ संस्कार झालेले असतात की मोठं झाल्यावर तो तो दिवस आला का क्षणभर का होईना मन वर्तमानातून भूतकाळात प्रवास करून येतचं. मला या अश्या माकडरुपी मनाची फार गम्मत वाटते . आली आठवण की लगेच डोळ्यासमोर चित्र उभं . स्मृतीपटलावर सगळा रिवर्स स्लाईड शो बघायचा  . केवढ ते  स्टोरेज !!  आज खास रामनवमी विशेष लिहायचा मूड .

एरवी निस्तेज पडलेली बोराखेडी रामनवमीच्या नऊ दिवस अगोदरच चैतन्यमय होऊन जायची. “रामनवमी नवरात्र” म्हणजे देशपांडे वाड्यातल्या आज्ज्यांना उत्साहाचं उधाण यायचं .  नऊ दिवस राममंदिरात दर्शनाला  जाणे , फुलांचे हार करणे , वाती फुलवाती करणे, तुळशीच्या मंजिरी तोडून आणणे , सोबत हळद्कुंकवाची कुयरी आणि वाटीत साखर ही सगळी पूर्वतयारी करून वाड्याच्या बाहेर पडायचं हा त्या  नऊ दिवसातला ठरलेला कार्यक्रम आणि दररोजच्या दिनचर्येतला बदल . देवळात जाणे म्हणजे वाड्यातून बाहेर पडण्यासाठीचं एक  निम्मित. पूर्वी घरंदाज बायका उठल्या का निघाल्या बाहेर अशा कूठेही जाऊ शकत नव्हत्या . आणि दिमतीला कायम  गडीमाणसं असल्यामुळे बाहेर क्वचितच  पडण्याचा योग. त्यामुळे अस कधीतरी बाहेर पडल्याचा आनंद सगळ्या देशपांडे स्त्रिया पुरेपूर घेत असत. ठेवणीतली लुगडी ( नऊवार) अश्या वेळेस बाहेर पडत.

देशपांडे वाड्याच्या मागच्या बाजूला भली मोठी मातीची गढी आहे. एखाद्या किल्ल्यासारखे ते उंचच उंच बुरूज.  बोराखेडीच्या अगदी सुरवातीच्या लेखात मी उल्लेख केल्याप्रमाणे बाजूलाच पाटलाचा वाडा आणि वाड्याच्या बाजूला शेतांच्या कडेला एक सुंदर रामाचं देऊळ . देऊळ तसं छोटस पण परिसर भला मोठा आणि तितकाच प्रसन्न.  देवळाच्या मध्यभागी सुंदर ,मनमोहक, गोड, गोंडस, लाघवी, सौम्य आणि मनाला भावणारी रामाची मूर्ती . मी अनेक राममंदिर बघितलेत पण बोराखेडीच्या देवळातला  बाल्यरूपी राम थेट हृदयाला जाऊन  भिडतो. मूर्तीच्या चेहऱ्यावर मिश्किल, आनंदी, चैतन्य, शांती, सगुणसुंदर आणि लावण्य  असे सगळे भाव  एकत्र हुबेहूब अनुभवायला मिळतात .  देवावर श्रद्धा असण्यापेक्षा मनातले भाव त्या कलाकुसरीत बघण्यात विशेष गम्मत असते. मूर्तिकारांच्या कलेचं विशेष कौतुक वाटत. मध्यभागी तो निर्गुण निराकार पुरुषोत्तम आणि डाव्या बाजूला बंधुप्रेमाची साक्ष पटविणारा लक्ष्मण , उजव्या बाजूला त्यागमूर्ती सीता. खरतर तीनही मुर्त्या एकाचं शिल्पकाराने बनविलेल्या पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर निरनिराळे भाव टिपण्याचं अचूक कौशल्य. रामाच्या चेहऱ्यावरच अप्रतिम तेज. लक्ष्मणाची तितकीच नम्र आणि भावपूर्ण मुद्रा . सीतेच्या चेहऱ्यावर सौंदर्य पण त्याला पावित्र्य  आणि मांगल्याची जोड !!!  अश्या त्या संगमरवराच्या तिन्ही मुर्त्या रामनवमीच्या उत्सवाला विशेष खुलून दिसायच्या. बोराखेडी ची अयोध्या नगरी होऊन जायची. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच राम दिसायचा. राम हा देव लोकांना विशेष भावतो . कदाचित रामायणामुळे असेलहि कारण  संसारातले भोग त्यालाही कुठे चुकले . असो आम्हाला काय ??? मोठे जस करणार त्यात आम्ही रममाण होऊन जायचो. कारण बोराखेडीत इतर फार काही करूही शकत नव्हतो.

रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी व्हायची. तुळशीपुढे नित्यनियमानी लिहील जाणार रांगोळीच “श्रीराम” त्या दिवशी उठून दिसायचं. रामाचा जन्म दुपारी बारा वाजताचा म्हणून सगळे दुपारपर्यंत उपवास करायचे. जन्म झाला की मग उपवास सोडायचा हे आदल्या दिवशीच चर्चेत ठरण्याच कारण म्हणजे सुनांना साबुदाणा भिजवण्याची आठवण. उपवास म्हणजे साबुदाण्याची उसळ ( मुंबई पुण्याकडे खिचडी म्हणतात) . सगळ्या बालगोपाळांचा आवडीचा पदार्थ. त्यासोबत शेंगदाण्याची आमटी !! कसलं अफलातून कॉम्बिनेशन लागत हे . ज्यांनी खाल्लं नसेल त्यांनी जरुर खाऊन बघावं .

आंघोळी झाल्या का जपून ठेवून दिलेले आईच्या साड्यांचे शिवलेले फ्रॉक घालून आम्ही तयार होऊन बसायचो. आज्जी लोकांचे बटवे , पिशव्या त्या परब्रम्ह रामाला द्यायला ओतप्रोत भरून जायच्या. सगळ भरभरून देणारा तो राम !!! यांच्या बटव्यातलं त्याला काय लागणार?? पण भक्तांची माया आंधळी असते.

सगळे देशपांडे स्त्री पुरुष सोबतच बाहेर पडायचे पण त्यातही पुरुष पुढे आणि स्त्रिया मागे . गावात अस जोडीने चालल का नाव ठेवतात अस आम्हाला सांगितलं जायचं . सगळे देशपांडे एखाद्या राजासारखे ऐटीत बाहेर पडायचे. आपल्याला बरीच लोक बघत असतात हे आम्हाला बाहेर पडल्यावर कळायचं. वतनदारी सगळ्यांनी पुरेपूर उपभोगली अस म्हणायला हरकत नाही. आता आठवलं तरी हसू येत या सगळ्या मजेदार गोष्टीचं. देवळात जाण्यात कसली आलीये ऐट पण असो देशपांडे अशेच होते.

आता सगळ्यात गंमतीचा आणि उत्सवाचा मुख्य भाग म्हणजे रामनवमी ला बाहेरून प्रवचन आणि कीर्तनकार बोलावले जायचे. वयाने म्हातारे , डोक्याला फेटा आणि कपाळाला  गंध लावलेले ते सद्गृहस्थ उत्सवमूर्ती असायचे. त्यांच्या मुखातून सगळ्यांना आता ते “राम कोण होता, तो कसा जन्माला हे  सगळ पाल्हाळ खूप लांबवून सांगायचे. म्हणजे रामानंद सागरांच रामायण सगळ्यांनी बघितलेलं असलं तरी यांची एक विशेष सिरियल टाईप वर्षानुवर्षे एकंच एक कथा एकाच पद्धतीने मनापासून सांगण्याची एक मजेशीर खासियत होती. आवाजात इतकी थरथरता असायची की बरेच शब्द कळायच्या आतच सगळे टाळ्या वाजवायचे. पण त्यांच संपूर्ण लक्ष्य मात्र   रामकथा सांगण्यात असायचं. आम्ही लहान होतो तेव्हा त्यातल्या  कथा फारचं मनोरंजक आणि काल्पनिक वाटायच्या आणि  मनापासून आवडायच्या.

कार्यक्रमाची सुरवात त्यांना पुष्पगुच्छ आणि कन्हेराच्या फुलांचा साधा हार गळ्यात घालून व्हायची. बाहेरून चांगला सुंदर फुलांचा एखादा महागडा हार घेऊन यावा असा विचारही कुणाच्या डोक्याला शिवलेला नसायचा . बोराखेडीच होती ती त्यामुळे आळस साहजिकच . अख्ख्या गावाला रामजन्मात रमवणाऱ्या प्रवचनकाराविषयीच प्रेम हे कान्हेरीच्या फुलात सामावून जायचं. ते सद्गृहस्थ पण तेवढ्या एका हाराने भारावून जायचे. मग कथेला सुरुवात व्हायची. बऱ्याच बायका पुरुषांनाना , पोरासोरांना कथेत काडीमात्र रस नसायचा . एवढ्याश्या प्रसादासाठी त्यांना बळजबरी त्या काल्पनिक अयोध्येत खेचल जायचं .

बायकांना तर एकमेकींच्या साड्या, दागिने यात आवड. कुणी आज काय घातलय.  केस फारच गळतायेत ग माझे, कुठल तेल लावायला पाहिजे , तो टेलर ब्लाउज काय मस्त शिवतो, माझं दुसऱ्याने फारच बिघडवलं  या आणि यासारख्या  विविध  चर्चा  प्रवचन सुरु असतानाच घोळक्या घोळक्यात सुरु असायच्या. काही खाष्ट आज्ज्यांना अश्या  गप्पा कानावर आल्या की डोक्यात जायचं. मग मागे वळून भस्कन अंगावर खेकसयाच्या ,” येता कशाला ग मग उत्सवाला, रामात मन रमत नसेल तर “ . त्यावर ,”यांच तरी  खरंच रमलेल आहे का मन ??”  असं तिथे जमलेल्या  पोरी , सूना मनातल्या मनात कुजबुजायच्या. पुन्हा  सगळे तेवढ्यापुरते गुपचूप .

तिकडे ते एकटे प्रवचनकार रामजन्मात मग्न असायचे. भाषणाची तयारी बऱ्यापैकी करून यायचे  पण अख्ख्या गावाला आणि त्यातला प्रत्येकाच्या माकड मनाला  गोष्टीत गुंतवून ठेवण किती कठीण हे त्यांना सोडून बाकी सगळ्यांना समजून चुकलेल असायचं.  थोडा थोडा भाग सांगून झाला का आपल “श्रीराम जयराम जयजय राम” याचा जल्लोष व्ह्यायचा. तो मात्र सगळेजण मनापासून गायचे. पुन्हा कथा सुरु झाली की पोरांच्या बालक्रीडा, वृद्धांच्या हळूच डुलक्या, कुणाच्या जांभया, तरुण मुलामुलांच एकमेकांना शोधण,  एकमेकांची चोरून नजरभेट सगळ निर्विकारपणे सुरु असायचं. अचानक एखाद कुत्र्याचं पिल्लू मांडवात घुसायच, त्यानी काही करायच्या आतच लोकांच हाड हाड करून त्याला हाकलावण आणि मग तेवढंच प्रवाचानापासून वेगळा विरंगुळा व्ह्यायचा . मग रामजन्मात त्या श्वानाचही आपलं स्वतःच योगदान असायचं.

सगळेच बारा वाजायची वाट बघायचे. कारण परफेक्ट बाराच्या ठोक्याला रामाचा जन्म व्ह्यायचा , पाळणा हलवला जायचा आणि बोराखेडी नगरी रामनामात दुमदुमून जायची. कथेच्या आधीचा  कंटाळवाणा सुर, आळस हळूहळू नाहीसा होऊन  आता सभेला  एक वेगळचं रूप यायचं. आता खरतर प्रवचनाला एक दिशा मिळायची. रामजन्माच्या  आधीची  माझ्या मनाला प्रचंड भावलेली एक कथा, प्रसंग मी इथे सांगते. प्रवचनकार म्हणजे ते बुवा जसे सांगायचे मी अगदी त्याचं शब्दात सांगायचा प्रयत्न करतेय.

साधारण साडे आकाराच्या सुमारास कथेचा गाभा  आणि मनाला खिळवून ठेवणारा भाग सुरु व्हायचा.  तर ऐका झाल असं की,  “लोकहो ,आता कौसल्येला प्रसुतीच्या कळा यायला सुरुवात होत आहे. राजा दशरथाच मन कासावीस होत आहे. सगळ्या अयोध्यावासीयांचे कान ती गोड बातमी ऐकायला आतुर आहेत. राजा दशराथावरचं उदंड प्रेम ,लोकांना बाळाच्या आगमनाची तयारी करण्यात ओढून नेत आहे. इतक्या वर्षांनी कौसल्येला बाळ होणार… पायसाच्या सेवनान तिन्ही राण्या गर्भवती झाल्या आणि आता आपला राजा पिता होणार…..,  म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, कुतूहल पसरलेलं आहे. अयोध्येतली जनता गरीब पण तितकीच प्रेमळ , कनवाळू आणि भोळी आहे .आपला राजा हेच  आपल सर्वस्व आहे या सर्वतोपरी विचारांची ती आहे.  दशरथाच्या त्या भव्य  प्रासादात दास्यांची लगबग सुरु आहे , कुणाच्या चेहऱ्यावर चिंता, तर कुठेतरी  घाई आणि उत्सुकता दिसून येतेय. त्या राजघराण्यात कोण भाग्यवान जन्माला येणार याची चर्चा ठिकठिकाणी सुरु आहे.

आणि तेवढ्यात बाराच ठोका पडतो , सूर्य डोक्यावर येतो आणि राजवाड्यातून नवजात शिशूचा , पुत्र रडण्याचा आवाज ऐकू येतो. चिंतेच रुपांतर क्षणार्धात अफाट आनंदात होत. धन्य धन्य तो दशरथ त्याच्या आनंदाला आता सीमाच उरली नाही आहे  !!!!! पशु, पक्षी, गाई, वासर , मुल, बायका आनंदानी  डोलून नृत्य करतायेत. तळपता सूर्यही  क्षणभर शीतल होऊन नवजात अर्भकाला आशिर्वाद देत आहे. राजवाड्यातून शंखाच्या सुमधुर स्वरानी आजुबाजूच  वातावरण मंत्रमुग्ध होतंय.  अयोध्येची धरणीमाता रांगोळ्या आणि फुलांनी सजून गेली आहे. प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये दिवे, समई लावत आहेत. नगरजनांचा  आनंद अगदी ओसंडून वाहत आहे. सगळीकडे आनंदींआनंद आणि ाआल्हाददायक वातावरण पसरलेलं आहे.

आपल्या दशरथ राजाला आणि कौसल्या राणीला पुत्र झाल्याचा  आनंद सामान्य जनतेला किती बर व्हावा !!!!!!!!!! आणि तो पुत्र कुणी सामान्य व्यक्ती नसून साक्षात  “राम”  आहे , तो सगुण साक्षात परमेश्वरचं आहे  हे सगळ विधिलिखित होत  अस सांगून  ते प्रवचनकार खूप सुंदर उदाहरण देऊन रामजन्म समजावून सांगायचे. यातलं किती खर ,किती खोट आणि  किती काल्पनिक ते रामालाच ठाऊक .

“ कौसल्या सर्वप्रथम जेव्हा  आपले लोचन उघडून बघते तेव्हा तिला त्या नीलवर्ण बाळाला बघून दर्शन घेतल्याचा आंनद होतोय. तिच्या नेत्रातून घळाघळा सुखाश्रु ओघळतायेत . तिचा कंठ दाटून आलाय. माता होण्याच्या सुखात ती न्हाऊन निघाली आहे.. त्या निळ्या सावळया वर्णाला बघून तिला पुन्हा पुन्हा धन्य वाटू लागलंय. प्रासादात अशी आनंदाची उधळण साहजिकच पण नगरामध्ये त्याहीपेक्षा दुप्पटीने उल्हास पसरलेला आहे.

नगरातल्या स्त्रिया एकमेकींच्या गळाभेट घेतायेत . “राम जन्माला ग सखे राम जन्माला” म्हणून नृत्य करत आहेत. राजा व राणीवर प्रचंड प्रेम करणाऱ्या अश्याच एका महान सखीला ही गोड बातमी कळली आणि ती स्वतःच चित्त हरवून बसली. स्वयंपाकघरातल  काम अर्धवट  सोडून तिला  प्रासादाकडे जाण्याचे वेध लागले. बाजूला आपल स्वतःच बाळ खेळत असल्याचंहि तिला भान नव्हत. शिंक्यातली लोणच्याची बरणी तिने जेवायला खाली काढली होती. बरणी पुन्हा शिंक्यात अडकवून ती धावतच राजवाड्याकडे जाणार होती. रामजन्मल्याची  ती गोड बातमी तिच्या कानावर पडता क्षणीच तिचा ऊर दाटून आला. तिचा  आनंद गगनात मावेनासा झाला. तिचं सगळ चित्त त्या निलवर्णीय राजकुमाराकडे लागल. देहानी फक्त ती घरात होती मन तर कधीच त्या लावण्य सुंदर श्रीरामामध्ये अडकल होत. कधी एकदा त्या  श्रीरामाच दर्शन घेतेय असं तिला झाल होत.

घाईघाईने लोणच्याच्या बरणीऐवजी  स्वतःच्या बाळाला शिंक्यात ठेवून ती काचेची बरणी काखेत घेऊन तिने राजवाड्याकडे धाव घेतली . राजवाड्यात गेल्यावर तिची ती काखेतली बरणी बघून सगळे हसले तेव्हा तिला  शिंक्यातल्या आपल्या लडिवाळ बाळाची आठवण झाली. ती धावतच घरी गेली , शिन्क्यातल्या आपल्या बाळाला खाली काढून त्याचे मुके घेऊ लागली . केवढी ही एकरूपता. रामामध्ये एकरुप झालेल्या त्या मातेला स्वतःच्या बाळाचेही भान नसावे ???? केवढे हे प्रेम. कुठली ही माया. कुठून फुटतो हा येवढा प्रेमाचा पाझर.  भगवंतावर  प्रेम तरी किती कराव आणि ते कस कराव.  प्रेम शिकवून येत नाही , ते  हृदयातून आपोआपं जाणवायला लागतं. भक्त आणि भगवंत यांची यांसारखी कितीतरी सुंदर सुंदर उदाहरण पुराणात नमूद आहेत. बोला “ श्रीराम जयराम जयराम”  असे म्हणून बुवा आपले प्रवचन सदासर्वदा ही प्रार्थना म्हणून थांबवायचे.

परंतू ही शेवटची कथा सांगताना सगळे एकचित्ताने त्यांच्याकडे कान देऊन ऐकायचे. तासाभरापूर्वी गडबड करणारे भटके कुत्रे पण डोळे मिटून बाजूलाच देह पसरवायचे . प्रवचनाचा सगळा गाभा म्हणजे निर्गुण सुंदर तो राम आणि त्यावर  प्रेम ,भक्ती, जीव लावणारे त्याचे भोळे भक्त इतकंच आम्हाला कळायचं. ही कथा सांगताना सगळ्यांचे डोळे भरून यायचे. तिकडे नवीन कपडे घालून दागदागिन्यांनी सजला नटलेला राम सुद्धा मिश्किल हसतोय आणि कथेचा आनंद घेतोय असं भासायचं.

त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रसाद वाटपाच काम. लहान मुलांच्या विशेष आवडीची वेळ.  झाला एकदा रामाचा जन्म आणि आता प्रसादावर तुटून पडायचं एवढेच डोक्यात विचार. निष्पाप बालमन.  राम दर वर्षी १२ वाजता जन्मणार पण प्रत्येक वर्षी निरनिराळा प्रसाद. त्यात सगळी मज्जा.

मोठी लोकं पण  प्रसादासाठी तशीच घाई करायचे. येवढा वेळ बसून मला प्रसाद मिळतो की नाही हे डोक्यातले विचार चेहऱ्यावर स्पष्ट दिसायचे. तरी बुवा प्रवचनात आवर्जून एक ओळ सांगायचे

“ ज्यांनी सेवा केली ते संत झाले आणि ज्यांनी नुसताच प्रसाद खाल्ला त्यांना जंत झाले” . पण बुवांच लांबलचक प्रवचन  ऐकणे म्हणजे एकप्रकारची सेवाचं असायची अस लोकं आपल्या मनाची समजूत काढायचे.

अशी ही आगळीवेगळी रामनवमी आम्ही बरीच बर्ष बोराखेडीत साजरी केलीये. राम आहे की नाही ह्या आस्तिक नास्तिकतेच्या वादापेक्षा रामचरित्रामुळे सुंदर गुणांची ओळख झाली हे महत्वाचं. तसे मला रावणातलेही गुण खूप आवडतात. रावण खूप बुद्धिमान होता. वेद, कला , गायन, नृत्य, संस्कृत पठण यांसारख्या बऱ्याच विद्येत तो पारंगत  होता. शंकराचा तो निस्सीम भक्त होता.कोण बरोबर कोण चूक यापेक्षा बालपणी सांगितलेल्या गोष्टीनी मुलांची कल्पनाशक्ती वाढते हे खर.  सारांश हाच की लहान मुलांना भरपूर  गोष्टी सांगायला हव्या . लहानपणी सांगितलेल्या गोष्टी आयुष्यभर हृदयात साठून ठेवल्या जातात. आपण मोठे होत असतो पण मनाला वयाच बंधन  नसत हव त्या वेळेला त्याला छोटं होता येत. आठवणीमध्ये रमता येत. कारण आठवणी खूप सुंदर असतात आणि माणस सोबत नसली तरी आठवणी आपण कायम सोबत घेऊन जाऊ शकतो.

Advertisements

आठवणींच्या कप्प्यातली बोराखेडी ३

आठवणी कागदावर उतरवायच्या  म्हंटल्या की अंतर्मनातल्या खोल  कप्प्यापर्यंत जाव लागत. तिथपर्यंत पोचण्याचा प्रवास थोडा किचकट . परंतू  तिथे पोचल्यावर जणू एखाद्या फुलबागेचा बंद दरवाजा अचानक  उघडावा आणि स्वच्छंदी उडणाऱ्या त्या फुलपाखारां प्रमाणे हळूहळू रंगबेरंगी  आठवणी आपल्याला स्पर्श करून जाव्यात  असंच काहीस होत . त्या  व्यक्तींना , त्या जागेला सजीव करण्याच सामर्थ्य त्या आठवणीत असत .  देहान्त झालेल्या व्यक्तींना “खुपते तिथे गुप्ते ” मधल्या शोप्रमाणे डायरेक्ट “दिल से” फोन लावता येतो.  गोष्टीतल्या माणसांशी जवळचा  संवाद घडतो.  त्यांच अस्तित्व, त्यांचा आत्मा  यावर स्वतंत्रपणे प्रकाश पडतो.  प्रत्येक व्यक्ती मनोरंजक किंवा कर्तृत्ववान नसली तरी ती एक स्वतंत्र ओळख आहे आणि या कॉपी पेस्टच्या दुनियेत  “व्यक्ती” पूर्णअंशाने कॉपी पेस्ट होत नाही  याच विशेष  वाटत . त्यात  बोराखेडी आणि आमचा देशपांडे वाडा एक अद्भूत सांगड .

 

यादव काका  –

                   मोठ्या वाड्याचे सूत्रधार , रचनाकार  यादव काका !!  ठेंगणी मूर्ती ,संतापी / खुन्नसी मुद्रा  ,कानात उगवलेल्या काळ्या केसांचे  झुबके , डोक्यावर ओथंबून वाहणार खोबरेल तेल , तेलानी  चमकणार ते गुळगुळीत टक्कल आणि मागून केसांची झालर कट  म्हणजे यादव काका !!! थोडक्यात आर. के. लक्ष्मण यांच कॉमन म्यान च कार्टून ही परफेक्ट उपमा . रागानी लालबुंद व्यायच आणि मग हातापायाला कंप  सुटण्याच नेहमीचच. हिरवी पांढरी पट्ट्याची विजार , जाहिरातीतल्या  “निरमा” वर  डोळे झाकून विश्वास ठेवून स्वहस्ताने धुतलेली ती पिवळसर पांढरी बनियन आणि एक हात मागे घेऊन कंबरेच पोक काढून चालण्याची लकब म्हणजे आमचे यादव काका. काळ्या  मंजन नी घासून घासून मातकटवलेले ते दात, कपाळावर आठ्या,  घामाघूम झालेला नाकाचा  शेंडा  , चौकोनी चेहरा , स्वविश्वात रममाण असलेली एक ब्रम्हचारी व्यक्ती ….

ब्रह्मचर्य हे वाड्याला नवीन नव्हत . दोन तीन मुंजे आधीपासूनच लाल ( दगडाला लाल रंग देऊन ) होऊन घुमटाकार देऊळात  गप गुमाने जाऊन बसले होते.  दोन तीन जिवंतपणे वाड्यात जगत होते. एवढ्या सगळ्या संसारी जीवांमध्ये ही लोक ठळकपणे उठून दिसायची. कदाचित त्यातच त्यांच  वेगळेपण होत. लग्न का झाल नाही ?? याला निरनिराळे कारण असली तरी देशपांडे वाड्यात तो एक लहरीपणा म्हणून संबोधल जाई.   अर्थातच संबोधणारे शिस्तबद्ध लग्नाच्या बंधनात अडकलेले हे सांगायलाच नको  .

यादव काकाचं लग्न का झाल नाही यावर बर्याच चर्चा व्हायच्या. पोटभरून  चहा पोह्यंचे कार्यक्रम पार पाडूनही एकाही पोह्याला चव नसल्याचं ते दिमाखात सांगायचे. लग्न या विषयाला जास्त  लहरीपणाने घेतलं तर आजुबाजुच्यां मध्यस्थांचा उत्साह हळूहळू मावळतो आणि वेळ निघून गेल्यावर ” न कोई उमंग है , न कोई तरंग है” हे  कटीपतंग मधले  सूर आपलेसे वाटू लागतात.कधीकधी त्यांच्याकडे बघून लग्न नाही झाल हेच बर झाल असही वाटायचं. उच्चतम एलएलएम ची पदवी प्राप्त करून त्याचं संपूर्ण आयुष्य बोराखेडी आणि वाडा इथपर्यंत सीमित राहील . पण शिक्षण फुकट जात नाही त्यामुळे त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा थोडाफार उपयोग वाड्याच्या विकासासाठी केला.  अर्थात अमुक एक शिक्षण तमुक क्षेत्रात वापरणे खरी कसोटीच.

लहान मुलांविषयी वाड्यात एक/ दोन व्यक्ती सोडल्या तर बालाकांप्रती  विशेष आस्था कुणालाच नव्हती. कुणाचा तसा पिंडच नव्हता .पाळण्यात जेवढे लाड झाले तेवढेच. त्यानंतर सगळेच  समजूतदार . यादव काकांचा लहान मुलांकडे बघण्याचा एक अनोखाच दृष्टीकोन. खिडकीतून “अबे ओ प्राण्या ” ही हाक म्हणजे नक्की लाड की ओरडा ?  हे मुलांना कळायच्या आतच यादव काकांची मूर्ती लगबगीने माडीवर निघून जायची .अधूनमधून कितवीत गेलास रे तू ? असा महिन्यागणिक  विचारलेला  प्रश्न काटा टोचल्यासारखा खुपायचा. प्रत्येक महिन्याला अस कस कुणी दुसर्या इयत्तेत जाऊ दिलं हो यादव काका  ?? अस प्रत्युत्तर मिळाल की ते स्वतःच खो खो हसायचे.

मुलं वाढवली नसली तरी बरीच फुलं त्यांनी वाड्यात  फुलवली. लहान शिशूचा तो नाजूक स्पर्श त्यांनी कधी अनुभवला नसावा पण झाडाला आलेल्या पहिल्या फुलाचा आनंद त्यांनी अनुभवला असेल हे निश्चित.  त्यासाठी बाहेरून फुलं तोडायला आलेल्या पोरापोरींच्या मागे काठी घेऊन तावातावाने जाणारे यादव काका म्हणजे जम्दग्निचा अवतारच भासायचे. त्यावरुन त्यांना “संतापलेला बुडा”  असंही संबोधलं जायचं .बागकाम, इलेक्ट्रिक फिटिंग , म्हशींची खरेदी विक्री, आमराईची देखभाल अशी अनेक काम त्यांना मनापासून आवडे. वाड्याची पुनर्बांधणी, त्यात आधुनिक सुविधांचा समावेश, विहिरीवरच्या मोटारीचा शोध यात त्यांनी वाड्यात स्वतंत्र इतिहास घडविला. लग्नाच्या बंधनातून मुक्त असलं की माणूस काय काय करू शकतो अस ते उपहासात्मक सांगून हसायचे. स्वतःच विनोद करून खो खो हसायच आणि दुसऱ्याच्या विनोदावर हसू  आल तरी तुच्छ टीका करून विषयाला  गंभीर स्वरूप आणायचं हे त्याचं मनोरंजनात्मक स्वभावविशेष .

कुणालाही जवळ न करणाऱ्या तुसड्या, तिरसट वृत्तीच्या यादव काकांना रेडीओ अतिप्रिय होता. त्यांचा तो पुरातन काळातला मोठा इलेक्ट्रिक रेडीओ , बाजूला लाकडी आरामखुर्ची आणि समोर पोलीस स्टेशन पर्यंत नजर जाणारी ती चौकोनी खिडकी ही त्यांची  बैठकीतली शान होती. शास्त्रीय संगीत आणि बिबिसी वरच्या बातम्या येईकताना ते एखाद्या स्थितप्रज्ञ पुतळ्यासारखे दिसायचे. चेहऱ्यावरच्या हावभावांचा फारच अभाव असायचा . असतात असेही काही चेहरे . कितीही वर्ष झाले, कुठलाही प्रसंग असला  तरीही ही लोक आहे त्याचं मुद्रेत दिसतात. तारुण्य , म्हातारपण, कार्यप्रसंग , पेहराव यासारख्या विषयांचा त्यांच्या एकंदर शरीर रचनेवर काडीमात्र फरक   नसतो.

घरात त्यांचा  बहुतेक सगळ्यांशीच अबोला . अधून मधून बाहेरच्यांशीपण कट्टी घ्यायची त्यांची अनोखी पध्दत सगळ्यात मजेशीर असायची  . जेवणाच्या ठराविक वेळेवर कोचावर येऊन बसले की भावजया पानं वाढायला घ्यायच्या. जेवताना तर  कमालीची शांतता. कढी आणि आमटी पितांना “सुर्र” चा जेवढा आवाज होईल तेवढाच.  समस्त बायकांशी त्यांच वाकडच. बायकांशीच काय ,लग्न झालेल्या लोकांशीच वैर. तरी दुरदुरच्या नातेवाईकांच्या पोराबाळांच्या लग्नाला नेटाने  हजेरी लावणारे यादव काका हे आमच्या देशपांडेंचे एकमेव प्रतिनिधी.

एकांत आणि एकाकीपणा यात जमीन आसमंताचा फरक. एकांत हा सुखद, आल्हाददायक,  सृजनात्मक असतो. एकांत नेहमीच  हवाहवासा वाटतो. चारचौघांपासून क्षणिक स्वीकारलेली  विलगता म्हणजे एकांत. एकांत हा जरूर मिळावा !! नाही मिळाला तर तो शोधावा. पण एकाकीपणा तितकाच घातक , भयावह, ओसाड. आजूबाजूला बरीच माणस असतानाही आलेला एकटेपणा म्हणजे एकाकीपण.  उद्विग्न, भांबावलेल मन आणि निराशा  मानगुटीवर बसलेली अवस्था म्हणजे एकटेपणा. स्वतः भोवती वलय तयार करून स्वतःत रमणारी लोक एकतर निरपेक्ष किंवा मनातून  एक्क्लकोंडी .  यादव काकांनी  स्वःत हून एकटेपणा निवडला होता.पण तो परिस्थितीमूळे होता की स्वभाव होता हे कोडच. जवळच्या माणसांशी अबोला, कट्टी घेणारे यादव काका मध्येच लहान मूलांसारखे भासायचे. दूरवरच्या नातेवाईकांना मात्र नियमित पत्रव्यवहार करायचे. त्यांनापण बरीच  पत्र  यायची.

पत्राचा शोध कसा लागला देव जाणे पण मला मनापासून पत्र लिहायला आवडत. जितक लिहायला आवडत तितकच  पत्र आलेलही विशेष भावत . लहानपणी आत्ये, मामे, मावस भावंडांच  परगावावरून आलेलं पोस्टकार्ड/अंतर्देशीय माझ्यासाठी आनंदाची लयलूट असायची . एवढ्याश्या कागदावर कितीतरी  भावना, संदेश ,गुज गोष्टी  हृदयापर्यंत पोचवण्याच सामर्थ्य होत त्या पत्रात. मी माझ्या लाडक्या आबांना बरीच पत्र लिहून द्यायची. त्यात “मोठ्यांना नमस्कार, लहानांना शुभाशीर्वाद . कळावे लोभ असावा ! आपलाच मन्याबापू ” हे  तोंडपाठ !! वडीलधारीमंडळींच्या पत्रात आपल्याला गोड पापा अस एकल की गाल प्रेमाने भरून जायचे , गुदगुदल्या व्हायच्या . सोशल मेडिया च्या विश्वात ती मज्जा नाही .

वाड्याच्या समोरच दहा पावलांवर कडूलिंबाच डेरेदार वृक्ष  होता . ती जागा म्हणजे देशपांडेंचा दरबार भरवण्याच स्थान गणल जायचं. यादव काका नेमानी संध्याकाळी तिथे हजेरी लावायचे. पहिले ते आले की हळूहळू तीनही वाड्यातली वयस्कर मंडळी आपापले स्थान ग्रहण करायचे. झाडाखालीच भले मोठे लाकूड अश्या  पद्धतीने चारही बाजूने मांडले होते की समोरासमोर बसून चर्चा तर व्हायचीच पण मुद्दा नाही पटला तर येणाऱ्या जाणार्या रस्त्यावरच्या लोकांचा मानाचा सलाम तरी मिळणार हे निश्चित. येणारा जाणारा शेतमजूर, गावकरी  हा वाटलचं तर घटकाभर खाली जमिनीवर बसायचा. देशपांडेंच्या बाजूला लाकडावर येऊन बसण्याची हिम्मत कधीचं कुणी केली नाही. त्यातही या  लोकांनी वतनदारी गाजवली याचं आज हसू येत . संध्याकाळच्या वेळी शेतातून परतणारे मजूर, गुरढोर, बकऱ्या, म्हशी , डोक्यावरून पदर घेऊन काखेत दळण घेऊन  जाणाऱ्या बायका ,पोलीस स्टेशन मधला एखादा तंटा , त्याभोवती जमणारी गर्दी,  कामावरून परतणारे कर्मचारी, टायरशी खेळणारी मूल सगळ्यांच लाईव्ह प्रक्षेपण तिथे घडायचं. विशेषतः राजकारणावर गंभीर चर्चा व्हायच्या . यादव काकांच वकिली भाषेतलं प्रारंभीच ” मुळात काय आहे की…. ”  हे विषयाच्या मुळाशी पोचण्याच वाक्य  सुरु झाल रे झाल  की त्या जागेचं  हळूहळू न्यायालय व्हायचं .  समोर बोलणारा कायमचं विरोधी पक्ष , कडूनिंब हा कधीही निकाल न देणारा न्यायाधीश आणि चुकीच्या वेळेला टपकणारा आणि विषयाचा संबंधहि नसलेला  एखादा मजूर म्हणजे आरोपी अश्या चित्रात त्या जागेच रुपांतर व्हायचं. यादव काकांचं वकिली भाषेत जितक प्राविण्य  होत त्यापेक्षा कैक पटीने त्यांच ” भो ” च्या सगळ्या शिव्यांवर विशेष प्रभुत्व होत.

देशपांडे वाड्यातली अशी एकही व्यक्ती किंवा गडी नसेल जी त्यांच्या ” भ” च्या शिव्याशैलीने सन्मानित झाली नसेल. अगदी त्यांच्या आईच्या वयाच्या बायकाही त्याला अपवाद नव्हत्या. कधीकधी तर म्हशीना पण शिव्या . काही काळानंतर त्यांनी स्वतःच  शब्द (शिव्या) निर्मिती केली. त्यातला “झब्बू” कायम जिभेवर तयारच.  भयताड , भूपंजी, आवंत  यांचा कमी अधिक प्रमाणात रागाच्या तीव्रतेनुसार वापर.  आजही झब्बू म्हंटल की मला खात्री  आहे सगळे देशपांडे खो खो हसतील आणि क्षणभर  डोळ्यासमोर यादव काका उभे राहतील.

यादव काकांसोबातचा मला आठवलेला किस्सा म्हणजे त्यांनी आम्हाला अनपेक्षितपणे घेऊन दिलेले ड्रेस . त्या दिवशी जमिनीचा सौदा खूप मोठ्या रकमेत आटोपला म्हणून त्यांची गाडी खुश होती. परिस्थितीचा फायदा घेऊन आम्ही त्यांना आता आम्हाला ड्रेस घेऊन दया म्हणून सुचवलं. नेहमी खेकसणारे यादव काका त्या दिवशी गालातल्या गालात खुदुखुदू हसत होते . आणि तुम्हाला काय वाटते ,” मी कुणालाही ड्रेस घेऊन देऊ शकतो” अस मोठेपणानी बोलून गेले. “कुणालाही पेक्षा आम्हालाच दया  ना !! ” या आमच्या वाक्याला त्यांनी च्यालेंज म्हणून स्वीकारलं आणि वाड्यात लगोलग जाऊन पांढरा सदरा , पायजमा घालून आले. आत्ताच चलायचं तर चला नाहीतर विसरा. हे येईकल्यावर मी आणि माझी ताई वृषाली  तडकदिशी आहे त्याचं कपड्यांवर मलकापूर च्या एसटी त बसलो.

इकडे  घरातले  फार चिडले ,” काय उगाच त्या यादव काकांच्या नादी लागता , ड्रेस काय कमी आहेत का तुम्हाला ” पण फुकटात मिळालेल्या पास चा जितका आनंद होतो तितका आनंद आम्हाला होत  होता . आणि त्यात हरहुन्नरी बालमन !! मिळाला ड्रेस तर मज्जाच नाहीतर मलकापूर चा डावला च खरा …प्रयत्न करायला काय हरकत आहे. पण अति आनंद घातकच . त्या दिवशी बाजारपेठेत  नेमका दुकानदारांचा  संप होता.  लौटरी आणि फुकटात मिळणाऱ्या गोष्टीना नशीब लागत हे शंभर टक्के  खर. कसबस शोधाशोध करून एक दुकान उघड दिसलं.   दुकानात गेल्यावर त्या  दुकानदारापेक्षा आम्हाला  पहिला भेडसावणारा प्रश्न म्हणजे बजेट !! ड्रेस च काय पण आयुष्यात बर्याच  बजेट बाहेरच्या गोष्टी आपल्याला हव्याहव्याशा वाटतात. पण बजेट मध्ये असेल तरच आम्हाला तो ड्रेस आवडतो अन्यथा उगाच कलर भडक दिसायला लागतो , त्यावरची नक्षी आवडत नाही. ही एकंदरीत सगळ्याच मध्यमवर्गीय लोकांची विचारसरणी असावी .  आहे त्या बजेट पेक्षा अजून कमी पैशात मिळाल तर सगळ्याच बायंकापोरीना  युद्धात विजयी झाल्याचा आनंद.

आम्ही यादव काकांकडे बघितलं, बजेट किती ?? कोपऱ्यात स्टुलावर हाताची घडी घालून बसलेल्या यादव काकांनी “बजेट बिजेट काही नाही” अस म्हणताक्षणी , आम्ही उडालोच. त्या काळात कार्यप्रसंगाशिवाय नवीन आणि महागडे ड्रेस घेण हे नियमातच बसत नव्हत. काकांची पण कुणालातरी खरेदी करून देण्याची पहिलीच वेळ आणि आम्हाला पण अनपेक्षितपणे नवीन, विनाबजेट ड्रेस  घेण्याची पहिलीच वेळ. दुकानदारासकट सगळेच भांबावून गेले. आम्ही उगाच फुशारक्या मारत  हा नको, तो नको , अजून महाग दाखवा म्हणून नाक मुरडू लागलो .

जाळीजाळीचा १५०० रूपये  श्रीदेवी  प्रकार काढून  दुकानदाराने “हाच सगळ्यात महाग” अस  म्हणून हात टेकले . ड्रेस चांगला असला तरी फक्त १५०० चाच काय म्हणून आम्ही खट्टू झालो. काय तरी मिजास असते ना मनाची. घ्यायचा तर  घ्या ,नाहीतर मी चाललो अस म्हणत यादव काकांनी डोक्याला रुमाल बांधला आणि मग आम्ही पण हातातली संधी जाईल की काय  म्हणून ” रंगबिरंगे बदल से ” गाण गुणगुणत  तेच श्रीदेवी प्याटर्न ड्रेस फायनल केले. जे मिळतंय ते ही मिळालं नसत . शिवाय हे सगळ आ म्हाला एक गंमतीदार स्वप्नागत वाटत होत. सगळी गम्मत वाड्यात  सांगितल्यावर सगळ्यांनी तोंडात बोट घातली. आत्तापर्यत कुणालाहि काहीही न देणाऱ्या यादव काकाना चक्क  ३००० रूपयांचा चुना लावला म्हणून आमची लोकप्रियता अधिक वाढली. त्या दिवशी चुलत असलेले यादव काका आम्हाला अचानक आमचे  सख्खे काका  वाटू लागले. पण तो दिवस संपल्यानंतर लगेच आमचा भ्रमनिरास झाला.

अडकलेल्या बर्याच जमिनी त्यांनी  सोडवल्या , काही जमिनी चुकीच्या लोकांना दान केल्या , गरज नसताना तीन मजली इमारत बांधली, हे सगळ स्वतःच्या मर्जीने आणि इतरांच्या नाराजीने केल्याने घरातल्यांपासून आधीच दुरावलेले यादव काका अजूनच एकाकी पडले.

यादव  काकांवरून वाटत , प्रत्येक मनुष्य हा एक घन (क्यूब)असतो  . त्याला निरनिराळया बाजू असतात. आपल्याला नेहमी एकंच बाजू बघायची सवय असते. त्याच दृष्टीने बघून त्या व्यक्तीची एकंच ओळख मनात साठवून ठेवलेली असते. पण तसं नसावं. एखादी बाजू नाही  पटली तर दुसर्या बाजूला बघावं. प्रत्येक बाजू  अजमावून बघावी . चांगली बाजू मिळेपर्यंत त्याला गोल फिरवावा.  घनाचे जसे वेगवेगळे सूत्र आहेत तसेच माणसांचे पण तयार होतील. त्यात ज्या बाजूचं आपल्या मनाशी समीकरणं जुळलं  तीचं त्या व्यक्तीची ओळख हृदयात जपावी म्हणजे नात्यांच मरण होणार नाही .

वाक्यात लिहिण जितक सोप्पं  प्रत्यक्षात तितकचं कठीण  हे जाणते मी . पण सहज विचार सुचला आणि मनालाच सांगून बघितला .  म्हातारपणात फार काळ खितपत न पडता यादव काकांच्या  इच्छेप्रमाणे एका झटक्यात त्यांच्या एकेरी  आयुष्याची प्राणज्योत विझली . बघितलं तर त्यांच सर्वसामान्य आयुष्य …….पण खोल अभ्यास केला तर निराळीच आयुष्याची गाथा . यादव काका भयंकर लहरी होते तरी ते देशपांडे होते . आमच्या परिवारचा एक भाग होते.त्यांच्या शेवटच्या काळात सगळेजण राग लोभ विसरून एकत्र आलेत . नेहमी एकटे राहिलेले यादव काका जाताजाता  आजूबाजूला माणसांची गर्दी डोळ्यात साठवून  गेले.  ती भव्य रंगीबिरंगी तीन माजली इमारत म्हणजे आजही कल्पनेतल्या यादव काकांच्या पुतळयाच प्रतीबिंब म्हणून जणू उभी आहे  !!!

 

आठवणींच्या कप्प्यातली बोराखेडी 2

शमी या मजेशीर पात्रानंतर अल्लाउद्दीनच्या जादूच्या दिव्यासारख्या खजीन्यातल्या बोराखेडीच्या आठवणी दाटून येतायेत. बोराखेडीच्या देशपांडे वाड्यात आम्ही जवळपास ३० जण सोबत राहायचो. मोठ्या वाड्यात गजाभाऊ,शलिनी वाहिनी, अनुराधा काकू , बाळा काका, यादव काका, राजू दादा , अनिता ताई आणि त्यांचा घरगडी रघुनाथ पंडित . दुसर्या घरात सुमन काकू, पकू दादा, ज्योती वहिनी, नंदू दादा, दिपू दादा , छोटे वैभव , योगु आणि त्यांचा गडी ढोरकी . आमच्या घरात अण्णा, मालती आजी, मोठी आजी, मन्या आबा, मंगला आजी, आई , बाबा, मी , वृषाली, चिमू आणि अधूनमधून वावरणारी उषाबाई आणि संजू बावस्कर . शिवाय दिवसाआड अचानक येणारा एखाददुसरा पाहुणा.
तीनही वाड्यात शेती असल्यामुळे गुर ढोर , गाई, वासर , म्हशी पाळल्या जात असत. त्यामुळे वेगळ्या प्राण्यांना घरी आणून लाडाने पाळणे हा विषय आमच्यासाठी पुलंसारखाचं हास्यास्पद .अगोदरच माणसांच्या त्या गर्दीत प्रेम तरी कुणाकुणावर कराव. शिवाय या घरातून त्या घरात फिरणाऱ्या मांजरी, गच्चीवर जाऊन भांडणारे बोके, पत्र्यावरून उड्या मारणारे माकड, फाटकं तोडून आत शिरणारे हटखोर कुत्रे , दिवसा ढवळ्या सतत निघणारे साप , पडीक जागेत फिरणारे मुंगुस यांच्याही कैक पिढया आमच्यासोबतच वाड्यात वाढत होत्या. अंधाऱ्या कोठडीतल्या तिजोरी आणि लाकडी पेट्यांच्या मागे फिरणारे उंदीर , औदुंबराच्या झाडाभोवतीचे मुंगळे हे सगळेच अनामिकपणे जीवनाचा दररोजचा भाग होऊन गेले होते. यातल्या प्रत्येक प्राण्यांनी केलेली करामत म्हणजे ” देशपांडे वाडा दी अनिमल प्लानेट ” अशी सुंदर डॉक्युमेंटरी बनू शकली असती.
साप निघाला की वाड्यातले सगळे हातच काम टाकून संकेतस्थळी पोचायचे. पोर सोर हि बातमी वाड्याबाहेरच्या घरांमधून सांगेपर्यंत काठ्या, कापसाचे बोळे , रॉकेल, काडेपेटी, टोर्च , सगळ तयार असायचं. मग बाहेरचा कुणी आडदांड, अनुभवी माणूस येऊन परिस्थितीचा आढावा घ्यायचा . तीनही घरातली म्हातारी लोक काठ्या टेकवत बी पी वाढल्यागत चिंतीत मुद्रा करून येणाऱ्या जाणार्याला नको नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडायचे .
आज्यांच आपलं भलतंच काहीतरी . आपापल्या देवघरात दिवा लावून साप दिसायच्या आधीच अंगाऱ्याचा डब्बा घेऊन लेकरा बाळांना लावत सुटायच्या . साप कुठून आला, तो कुणाला आधी दिसला, कसा होता , कुठल्या नालीकडून निघू शकतो अश्या आणि बर्याच चर्चा तिथेच मोठमोठ्यानी सुरु व्हायच्या . त्यात गवत खूप वाढल आहे, स्वच्छता करायला हवी . माणसच मिळत नाही आजकाल, कामचुकार झालाय शालक्या. वगेरे वगेरे …..आता एवढ्या लोकांच्या चाहूलीमुळे तो साप कशाला बाहेर येतोय . मग अर्धा एक तास सगळे मोकळ्या गप्पा ठोकायचे . स्त्रियांनाही सापामुळे कामामध्ये तेवढाच ब्रेक मिळायचा. आमच्या सारखी पोर या फटीतून त्या फटीत गेला असेल का म्हणून उगाच शोधत फिरायचे. साप मारायला बाहेरून बोलावलेल्या मंडळीना अंगणातच चहापाण्याचा कार्यक्रम होई आणि नंतर जो तो आपआपल्या कामाला निघून जाई.
सगळ वातावरण शांत झाल्यावर सुमन वहिनी आरामात दबकी पावलं टाकत घडलेल्या स्थळी जायच्या आणि नाकाला पदर लावून गहन विचार करायच्या. कुणी अंगणातून जाताना दिसलच तर ” काय ग दीपा साप निघाला होता म्हणे सकाळी ? घ्या आता !!! मला कुण्णी म्हणजे कुण्णी काहीच सांगत नाही बाई आमच्याकडे ! ” ही एक व्यथा, तक्रारीचा सूर प्रत्येक वाक्यागणिक , प्रत्यके प्रसंगाला त्यांचा ठरलेला असायचा. “कसा होता ग ? पहिला का तू ? त्याला मेल्याला आपल्याच वाड्यात का लपून बसायच होत ” ही दर वेळेची साप निघून गेल्यानंतरची शेवटची चौकशी असायची. सुमन वहिनी हा पण एक स्वतंत्र अभ्यासाचा सखोल विषय आहे.
बरेच साप पकडून मारलेले पण आठवणीत आहेत. मेलेल्या सापाला काठीवर पकडून दूर उकिरड्यावर टाकले जाई. आणि येताना ती काठी लिंबाच्या झाडाला आपटवली जाई. हा पूर्वापार नियम. त्या लिंबाच्या झाडाशी कैक आठवणी जोडल्या गेल्या आहेत.अश्या प्रकारे दर पंधरवाड्यात साप आम्हाला आणि आम्ही सापाला दर्शन द्यायचो.
उन्हाळ्यात माकडांचा हैदोस. जीव नकोसा करायचे. भली मोठी हवेली आणि वाडे उनाडायला मिळायचे मग कसले येईकतात ते. सकाळी सकाळी कुहू कुहू च्या आवाजांनी उठण्यापेक्षा हूप हूप आवाजानेच आमची प्रभात मंगल व्हायची. विदर्भातला उकाडा आणि पंख्यांचा अभाव त्यामुळे गच्चीवर गादया आणि अंगणात पलंग टाकून झोपायची फार जुनी पध्दत . त्या खुल्या आकाशाखाली तारे मोजत झोपण्यात आमचे बालपण गेले यापेक्षा श्रीमंती अजून काहीच नसते हे आज प्रकर्षाने जाणवते . सकाळी दिवस उजाडल्याबरोबर माकडांचा आवाज आणि त्यांच्या उड्या सुरु होत. घाबरून अंथरुणासहित आम्ही माडीत येऊन झोपायचो. गच्ची म्हणजे मोकळी जागा आणि माडी म्हणजे गच्चीला लागुनच छप्पर असलेली खोली पण घराच्या वरचीच. इतक्या जोरात उडयांचं थैमान घालायचे की बऱ्याचदा भिंती , पत्रे, कौल आणि टी वी चे अन्टेना , सीताफळाची झाड , गच्चीवर वाळत घातलेल्या डाळी , ज्वारी ,पापड, कुरडया यांची नासधूस व्हायची.
वरच आटोपल्यावर खाली संडासाच्या बाजूला हौदाजवळ जमायचे आणि टोळी टोळीने पाणी प्यायचे. आम्ही खिडकीत बसून त्यांच निरीक्षण करायचो. आमचे लेन्स्र रुपी कॅमेरे असलेले दोन डोळे त्यांच्या प्रत्येक हालचालीला टिपायचे. स्वयंपाकघर पुरातन काळातील असल्यामुळे प्रयेकाच्या स्वयंपाकघराला एक झरोका म्हणजेच खिडकी असायची त्यातून काय शिजतंय हे हलकेच बघायचे. चुकून वर नजर गेली तर काळाकूटट चेहरा आणि पांढरे दात खातनाची त्यांची भयावह मुद्रा दिसायची. घरातून पोळ्यांचा डब्बा लंपास करण्याचा प्रकार पण फार व्हायचा. एकदा रामरक्षा म्हणत असताना ज्योती वहिनींच्या पाठीमागे एक हनुमान रूपी माकड येऊन एकत बसल होत. एवढी एक माकडांबद्दलची श्रद्धेची आठवण सोडली तर बाकी त्याचं सगळचं त्रासदायक . माकडांच्या मागे भुंकणारे कुत्रे आले की मग ते त्यांचा अड्डा बदलवत असत. उन्हाळ्यात , दिवाळीत शहरातून येणाऱ्या पाहुण्यांना माकड बघून फार कुतूहल वाटायचं आणि त्यात नवीन काय आहे अस म्हणून आम्ही माकड सोडून त्यांची तोंड बघत बसायचो. शेवटी मनुष्याची उत्पत्ती माकडापासूनच झालीये हे खर.
मोठ्या वाड्याची रचना घरंदाज , प्रशस्त आणि सुबक होती. आमचे दोन वाडे बऱ्यापैकी समसमान होते. मुख्यप्रवेशालाच सुंदर नक्षीकाम केलेला दिंडीचा दरवाजा सगळीकडे सारखाच होता. प्रवेशद्वाराला कुलूप लावलेलं आम्ही कधी बघितलेलंच नाही. शिवाय त्याची कडी कोंड पण तुटलेली. तीन माजली इमारत ,वर जाळीच्या खिडक्या , पारंपारिक पद्धतीची घसरती कौलारू मांडणी. मुख्याप्रवेशद्वाराच्या बाजूला दोन कोनाडे होते. त्यानी दरवाजा फारच उठून दिसायचा. फक्त नंतर नंतर त्या कोनाड्यात शोभेच्या वस्तू सोडून नको नको ते कोंबून ठेवलं जाई ते फार खटकायचं. पण स्वतंत्रता ही कणाकणात पसरलेली असल्यामुळे ते दोन कोनाडेहि त्याला अपवाद नव्हते आणि कुणाला हटकून बोललं की लगेच सातबाऱ्याचे कागद बाहेर निघायचे. त्यापेक्षा कोनाड्यातल्या त्या किळसवाण्या वस्तू म्हणजे जणू फुलदाणी आहे अस आम्ही आमच्या नजरेला सांगायचो. फुल, झाड ,वेली, कोपऱ्यातलं तुळशीवृंदावन आणि बाहेर प्रशस्त अंगण .
अंगण हा आमच्यासाठी वाड्यातला एक रंगमंच होता. आम्ही घरापेक्षा अंगणातच अधिक वाढलो अस म्हंटल तर वावग ठरणार नाही. दिवसभरातल्या कितीतरी गोष्टी अंगणातच घडायच्या. भल्या पहाटे शेणाचा सडा त्यावर रेखीव ठिपक्यांची रांगोळी, तुळशीच्या बाजूचं || श्रीराम || म्हणजे जणू त्या कोवळ्या रविकिरणासाठीचा गालीचा असायचा. सकाळचा चहा, पेपर वाचन , तेल लावून वेण्या फण्या घालणे , मेथी,पालकच्या जुड्या निवडणे सगळ सगळ त्या बारा बाय बारा च्या चौकोनी जागेत व्हायचं आणि वाड्याच अर्धांग असल्यागत अंगणही दिवसभर दिमाखात मिरवायचं.
मोठ्या वाड्याच्या आत खूप साऱ्या स्वतंत्र खोल्या होत्या. वाड्याच्या आतच विहीर , तिला छोटा दरवाजा आणि त्यावर मजबूत रहाट बसवलेला होता. बाराही महिने तिला पाणी असायचे आणि त्या पाण्याची चव आमच्या विहिरीच्या पाण्यापेक्षा मधुर होती. आमचे दोन वाडे मिळून मागच्या अंगणात जमिनिसपाट खोल विहीर होती.
पाण्याची टंचाई बाराही महिने कायम असायची. नळ आठवड्यातून एकदा हजेरी लावायचे . विहिरीच पाणी गुलझारच काढत असे आणि तोच हौद भरत असे पण तो नाही आला की बाबा पाणी ओढायचे आणि आम्ही बादल्या बादल्यानी हौद भरायचो. सगळेच कामाला लागायचे. थोड्या थोड्या अंतरावरून पाण्याच्या बादल्या पुढे सरकवायचं. बाहेरून येणाऱ्या नळाला फोर्स खूपच कमी असल्यामुळे पाईप लावता येत नसे. मग फोर्स येण्यासाठी खड्डा करून त्यात नळाचा पाईप तोडला जाई. कधी खड्ड्यातून , कधी दवाखान्याच्या नळावरून, कधी पाण्याच्या टाकीजवळच्या गुरांच्या झरयातून पाणी उपसलेल आठवणीत आहे. त्यात नळावरची भांडण , आपल्या भांड्याचा नंबर लावणे, रांगेत उभे राहणे असले मिश्किल पण व्यवहारिक शिक्षण फुकटमध्ये देणारी बोराखेडी ही युनिवर्सिटीच्या बरोबरच होती.

तासंतास वीज जाणे बोराखेडीला नवीन नव्हते मग अंगणात बाहेरच सगळ्यांचा कट्टा जमायचा . त्यात अनुराधा काकू, शालिनी वहिनी, मालती आजी आम्हाला रामरक्षा, हनुमान स्तोत्र , गणपती अथर्वशीर्ष शिकवायला बसवायच्या. किती सहजतेने सगळे संस्कार घडत होते याचं विशेष. तो आनंददायी बालसंस्कार वर्ग आज शोधूनही सापडणार नाही. अंगणातच आमची अंगतपंगत बसायची. अंगतपंगत म्हणजे आपापल्या घरातली जेवणाची ताट आणून एकत्र जेवण्याचा उत्सव . चटया, सतरंज्या टाकून सगळे गोलाकार जेवायला बसायचो. थंडगार पाण्याचे माठ आणि घागरी कन्हेराच्या झाडाखाली कायमच भरलेल्या असायच्या. सोबतीला कांदा, पापड, बिबड्या ( विदर्भातला लेवा पाटलांचा पापडाचा प्रकार) , तेलावर परतवलेल्या शेतातल्या हिरव्या मिरच्या, वरून तळलेल तिखट, आज्यांनी केलेल्या खोबर लसून, कराळ, तिळाच्या चटण्या , मेतकुट जेवणाची रंगत वाढवायचे. विदर्भात एकूणच तिखट खाणारी लोक असल्यामुळे गोडाच सगळ्यांशीच वाकड . वांग्याचं भरीत ,भाजी , उडदाच खमंग वरण, ज्वारीची भाकरी, मिरच्यांचा ठेचा, पिठलं , शेवेची भाजी यावर सगळेच तुटून पडायचे. पदार्थ महत्त्वाचा नसून तो खातानाच आजुबाजूच वातावरण ,त्या पदार्थाची लज्जत वाढवण्यात किती प्रभावकारी ठरत हे प्रकर्षाने जाणवते .
चंद्राच्या शीतल प्रकाशात चांदण्या रात्रीचं ते सगळ्यांनी एकत्र केलेलं सहभोजन मला कुठल्याही कॅण्डल लाईट डीनर पेक्षा अधिक मोलाच वाटत.

आठवणींच्या कप्प्यातली बोराखेडी

बोराखेडी या नावात इतकी गम्मत आणि कुतूहल आहे कि आजही नुसत नाव ओठावर आलं की भराभर सोनेरी आठवणी पुन्हा नव्याने ताज्या होतात. या चार अक्षरांनी कित्याकांचे बालपण सुखद बनवले आहे. एस्सेल वर्ल्ड, थ्रीडी सिनेमा,किंवा महागडी इलेक्ट्रोनिक खेळणी यांपैकी काहीच नसल तरी त्यापेक्षा कितीतरी पटीने अद्भूत , अनाकलनिय , गम्मत, मज्जा इथे अनुभवायला मिळालीये. माझ्या जन्मापासून ते वयाच्या अठरा वर्षांपर्यंत मी त्या पवित्र भूमीच्या अंगाखांद्यावर वाढली ,मोठी झाली. बोराखेडी नी खूप शिकवलं, घडवलं . कैक पिढ्यांचं व्यक्तीमत्त्व घडविण्यात बोराखेडी च मोलाच योगदान आहे.
वऱ्हाडातील बुलढाणा जिल्हयात आडगंगा नदीच्या काठी वसलेलं हे छोटस गावं !! गावाच वैशिट्य अस फारस काहीच नाही . सौंदर्य,नीटनेटकेपणा या सगळ्यांपासून बोराखेडी फार कोसं दूर होती. बेरोजगारी, आळस, बाराही महिने दुष्काळी शेती, गरिबी याची शाल पांघरून बोराखेडी आणि तिथले रहिवासी नेहमीच निद्रा देवीच्या कुशीत गाढ झोपलेली असायची . बर आध्यात्म,भक्ती, ज्ञान,कला, देशभक्ती, विकास याचा हलकासा स्पर्श सुद्धा बोराखेडीतल्या जीविताना झालेला कधी आठवणीत नाही . आला दिवस घालवायचा आणि उरलं सुरलं दुष्काळाच्या जाजमाखाली लोटून द्यायच.
बोराखेडी गावात काय काय आहे ? तर गावाची सुरवात हि ब्रिटीशांच्या काळातल (पण आता पुनर्बांधणी केलेल्या) पोलीस ठाण्यापासून होते . समोरच कायम खंगलेला, रोग्यांनी गजबजलेला, पण डॉक्टरांचा पत्ता नसलेला मध्यवर्ती अस्वच्छ दवाखाना .बाजूलाच डांबरी अखंड रोड आणि रोडवरून वडगाव ला जाणारी एकमेव एस.टी. बस !! नदी, लागूनच पुरातन मस्जिद , जिल्हा परिषदची गावातली एकुलती एक शाळा राम, मारोती आणि देवीच दगडी देऊळ, मातीच्या गढी , गढीच्या आत उंचावर पाटलाचा वाडा, आजूबाजूला क्वचितच ( कोरडा विदर्भ )हिरवीगार दिसणारी शेत , मोजकी वडडर, धोबी, लेवा पाटील जमात , स्वतंत्र मुस्लीम गल्ली, आणि मध्यभागी देशपांडे आणि देशपांडेंचा वाडा !!! इतक्या छोट्या चित्रात माझ्या कल्पनेतली बोरखेडी संपते.
आमच्या आजोबा, पंजोबांच्या काळात पूर्ण गावं त्यांच्याच ताब्यात असल्याच येईकीवात होत. गावचे वतनदार असल्यामुळे जमिनी, शेत त्यांनी गाव च्या पुनर्विकासासाठी दान केलेल्या नोंदिवात आहेत. देशपांडे चा वाडा हे इतरांसाठी जस अप्रूप होत तसच ती जागा आमच्यासाठी हृदयाचा तुकडा होती आणि आजहि आहे. पाहुणे, पाहुण्यांचे पाहुणे, मित्र, पक्षी, पशू (कधीही न पाळलेले पण देशपांडे वाद्याला अंगवळणी पडलेले) भटके अगोचर, निशाचर प्राणी , सगळ्यांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीचा तो हवाहवासा पिकनिक स्पॉट होता. विदर्भातल्या अतिभयंकर उष्ण हवामानातही बाहेरच्या सगळ्यांनाच हिल स्टेशन पण तुच्छ वाटाव इतका तो सुखद गारवा होता. बाहेरच्या तप्त वाऱ्यान पेक्षा इथली माणस , त्यांच ओसंडून वाहणार शीतल प्रेम, तिथे शिजवलेल साध पण स्वादिष्ट अन्न सगळ्यांनाच आतून शांत, तृप्त आणि हळव करून जायचं. संस्कृती, धर्म, राजकारण, कला याचं गावात नैराश्य असल तरी देशपांडे वाड्यात ते ओतप्रोत भरलेले होत. ब्राह्मण्य , सोवळ ओवळ याचीही स्पष्ट कडा वाड्याभोवती कुंपण घालून होती.
इथल्या मातीला स्वतंत्र पणाचा एक अनोखाच सुगंध होता. या मातीत कुठलेही नियम, बंधन न ठेवता, मुक्तपणे सगळ्यांना जगण्याचा हक्क होता. वेळेची कुणालाही कधीच घाई नव्हती . त्यामुळे कदाचित हि जागा बाहेरून येणार्याला हवीहवीशी वाटे. अगदी कुत्रे, मांजर, गडी माणस, गुर ढोर आणि त्यांचे मालक सगळेच आपापल्या मनाचे राजे होते. प्रत्येकामध्ये आम्ही “बोराखेडी कर”म्हणून एक निराळा रुबाब होता. आणि तेवढेच काय ते सगळ्यात साम्य होते. एकूणच बोराखेडी हे गाव फार कष्टीक, होतकरू वगैरे मुळीच नव्हते . आळस घरोघरी, गल्लोगल्ली ठासुन भरला होता आणि हेच बाहेरच्या मूली ज्या सूना म्हणून बोराखेडीचा भाग झाल्या होत्या त्या समस्त स्त्री जातीच एकमेव दुःखाच मूळ कारण बनत चालल होत . “आमच्या माहेरी नाही आम्ही असे बघितले बोराखेडीसारखे विक्षिप्त, आळशी लोक !! ” हे प्रत्येक घराघरातून दिवसागणिक निघालेलं आई, काकू, वाहिनी यांच्या तोंडच ब्रीदवाक्य होत. आणि त्यावर बोरखेडीकरांच ठरलेल प्रत्युत्तर ” आल्या मोठ्या लंडनहून ! आमच्या पूर्वजांची कर्तबगारी आणि इस्टेट तुमच्या अख्या खानदानात पण कुणाकडे नसेल !! चला चहा टाका आता !!! ” मुळात काय आहे कि प्रत्येक नवरा बायकोच्या भांडणात बोराखेडी हा एक वादाचा, कधी कधी अभिमानाचा तर कधी कधी संतापाचा मुद्दा ठरलेला असायचा. तरीही आम्हाला बोराखेडी प्रिय होती आणि आजही तिचा आम्हाला अभिमान आहे .
हे सगळ झाल बोराखेडी विषयी . परंतू जिच्यामुळे ती कायम चर्चेत राहिली ती म्हणजे इथली लोक ,एक एक नमुने !! फार पूर्वीपासून पिढ्यानपिढ्या एकत्र राहिलेले हे वतनदार कुटुंब पुढे तीन स्वतंत्र वाड्यात विभागाल गेलं. ज्याची जितकी इस्टेट जास्त , त्याचा तितका दबदबा असे. मी विष्णुपन्तांच्या वंशातली. माझे आजोबा मोरुआन्ना म्हणजेच मोरेश्वर देशपांडे हे सुशिक्षित , होतकरू आणि परिस्थितीची जाणीव असलेल उद्दात व्यक्तिमत्त्व होत. लहान वयात आई वडिलांचं छत्र हरवलं आणि लहान बहिण भावंडांची जबाबदारी खांद्यावर पडली की समजूतदारपणा आपसूकच येतो. तसच काहीस त्यांच झालेलं. मोठी आजी म्हणजे शांता बाई देशपांडे ही त्यांची नात्याने मोठी वहिनी असली तरी तिने सगळ्याच दिराचा, नंदाचा पोटच्या मुलांसारखा सांभाळ केला. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी बालविधवा झालेली, दोन जुळ्या पण अल्पायुषी मुलीना जन्म दिलेली ती अभागी अशिक्षित स्त्री . पण दिशाहीन घराचा आधार बनून ती खर्या अर्थी सौभाग्यवती बनली . यांच सगळ्याचं आयुष्य अस एका ओळीत लिहून संपवण्या इतक लहान नव्हतच मुळी !!! आजोबांचे लहान भाऊ कै बबनराव देशपांडे यांच्या मनात वयाच्या एकाराव्या वर्षापासून देशभक्ती चे वारे वाहू लागले आणि त्यांनी आपले जीवन देशासाठी अर्पण केले. अश्या घरात लहानच मोठं होत असताना संस्काराचे पुस्तकी धडे जवळून अनुभवण्याची साक्ष पटते .
बोराखेडी हि वेगळी का वाटायची ते इथल्या ऐतिहासिक, विलक्षण, मनोरंजक पात्रांमुळे . त्यातली मला जी ठळकपणे जाणवतात अश्या पत्रांचा मी इथे उल्लेख केला आहे . सगळ्यात मजेशीर पात्रापासून सुरवात करायची झाली तर ती म्हणजे शम्मी !!! हो !! हो !! शम्मीच !

शम्मी –    शम्मी आमच्या घरातली मोलकरीण !! दणकट बांधा, मळखोर सलवार कमीज, भलत्याच रंगाचा दुपट्टा, बोच्काटलेले केस, खड्यानिराली झालेली नाकातली चमकी, पिवलेगर्द दात, आणि शिवलेली (पुरुषी) चप्पल हे शम्मीच हुबेहूब वर्णन . विरंगुळा म्हणून शिव्या देत देत सुटलेली , बुर्ख्यालाही न जुमानणारी बेभान, हरहुन्नरी स्त्री म्हणजे शम्मी ! मालती आजी तर तिला पुरूषच म्हणायची. तिच्या तोंडाचा बराचसा उपयोग खाण्यापेक्षा दुसर्यांना मुस्लिम भाषेत अखंड शिव्या देण्यात आणि कायम तक्रारी करण्यातच गेलेला असे. आमची कुणाचीच नाव तिने कधी सरळ आणि पूर्ण घेतलेली आमच्या कानांनी तरी येईकलीच नसावीत . वैभ्या,चिम्या,दीपे, योग्या, सौभ्या, राणे, गण्या !! आ णि आजही वयाच्या पन्नाशीला ती त्याचं रुपात बघायला मिळते हे विशेष. काम करता करता कंटाळून कुणालातरी पकडायच आणि सुरु करायचं हा तिचा छंदच जणू . लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांशी तिचं भांडण होत असे . मग मुलही तिला “शम्मा ढोल कचोरी मोल , कचोरीत पडला खडा ! शम्मा ढोल बडा ” अस म्हणून चिडवायचे आणि ती त्यांच्या मागे दगड घेऊन धावायची . एकूणच तिरसट, सडेतोड,फटकळ हे विशेषण तिच्याचसाठी बनले आहेत हे वाटणे साहजिकच !! मुद्दा फारच किरकोळ असला तरी तिला तो दिवसभर पुरायचा, घरोघरी ती तोच सांगत सुटायची आणि त्याचं ओघात ती भली मोठ मोठी काम हाताआड करायची .
विहिरीवरून जड लोखंडाच्या पाण्याच्या बादल्या ओढताना , दगडावर टोपलेटोपले कपडे धुताना तिच्यातल्या पुरुषी शक्तीचा प्रत्यत यायचा. पाहुण्यांच्या कपड्यांचे बटन तुटेपर्यंत ती कपड्यांना आपटायची आणि कपडे किती मळवता म्हणून चार शब्द त्यांनाही सुनवायची ! .आईवडिलांविना वाढलेली ही अनाथ मुस्लीम पोर काम शोधत शोधत देशपांडेंच्या वाड्यात आली आणि इथल्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग बनून गेली. फक्त धर्म आणि ठेवणीतल्या शिव्यांना सोडलं तर तिला ब्राम्हणाच सोवळ ओवल, कुलाचार, महालक्ष्म्या, सण वार यांच जाणीवपूर्वक ज्ञान असे. चुकून देवाचं भांड घासण्यात आल की ते ती लखलखवून बाजूला उपड घालून ठेवी.
प्रेम, माया , आपुलकी, खाणपीण, कपडालत्ता घरच्यासारखा मिळत असेल तर धर्म आणि त्याविषयी च्या गावातल्या चर्चांना भिक घालायचं नाही इतक्या साध्या आणि सोप्या विवेकबुद्धीने ती काम करायची आणि त्यामुळे आजही ती तिथेच काम करतेय. गावभारातल्या इकडच्या गप्पा तिकडे सांगायच्या , कुणाच्या घरातली सून कशी काम करत नाही, नवऱ्याकडून कोण कस पळून आल, कुणाच्या प्रेताला पोचवायला किती लोक जमली होती, बंबई चे पोर कसे पैस्यांच्या मागे धावतात, हे तिचे आवडीचे विषय असे . कुठल्याही नात्याचा हिला फारसा स्पर्श नसल्यामुळे हिला सगळेच चुकीचे वाटायचे.
आम्हाला समज यायच्या वयात तिचं लग्न ठरलं. आमच्यासाठी तिचं लग्न म्हणजे एक कुतुहालाचच विषय होता. ही बया बायकोच्या भूमिकेत कशी दिसेल याचं सगळ्यांनाच अप्रूप होत. ” निकाह कुबूल है .. कुबूल है! ” शम्मी कशी म्हणेल , पडद्याच्या आत हीला कस गप्प बसवेल, ही कशी लाजेल ? असे फिल्मी विचार आम्हाला स्वस्थ बसू देत नसत . बर तिला प्रेमानी चिडवल, तिची स्तुती केली तरी ती भांडायला उठायची. फक्त अण्णानाच काय ती घाबरायची . आपला कर्ताधर्ता म्हणून त्यांनाच तिने तो अधिकार दिला होता.
त्यांनाही मग ती गमतीगमतीत चिडवायची . आपने तो सर्विस वाली बहु ढूनढ के लायी ! इजू दादा को अच्छी बीबी मिली . “मै क्या झूठ बोल रही हुं , क्या? ” हे दर १० मिनिटांनी उद्गारलेले वाक्य म्हणजे आपण तिच्याशी सहमत आहोत की नाही हे तिची तपासायची मोजपट्टी असायची.
अशीच एक दिवशी दुपारी चार च्या सुमारास चमकीचा कुर्ता आणि हिरवी सलवार घालून पुढे ती आणि तिच्या मागे एक पांढरा सदरा, पायजमा घातलेला साठीतला पुरुष वाड्याकडे येताना दिसला. तसे आम्ही सगळे धावत सुटलो. शम्मिनी ये मेरा बुढ्ढा म्हणून ओळख करून दिली आणि तिचा लग्न हा विषय तिथेच संपला . आमच्या बालमनात पडलेले ते कैक लग्नविषयक प्रश्न तिच्या एका वाक्यापुढे धुळीला मिळाले. त्याचं नाव करीम असलं तरी ती त्याला करीम बुढ्ढा म्हणायची. साठीतला तो बिजवर बराच समंजस, कष्टाळू आणि मृदुभाषी होता. पण त्याच्या येण्यामुळे हिच्या तोंडाच्या पट्ट्याची तीव्रता काडीमात्र कमी झाली नाही.उलट आता त्याच्या नावाचीही त्या पट्ट्यावर भर पडली. ती त्याच्याशीही दुसर्या दिवशीपासून भांडायला लागली. तो तिला मुलीसारखा समजून घ्यायचा. चार शहाणपणाच्या गोष्टी सांगायचा . पण हि त्याच्यावर पण खेकसायाची. त्याला म्हातारपणी आधार आणि पोटाला अन्न हव होत म्हणून त्यांनी लग्न केल अशी तो बर्याचदा स्पष्ट कबुलीही द्यायचा.
भांडी, केर, फरशी हिच्या तो पेक्षा स्वच्छ घासायचा. हे निर्भीड, स्वत्रंत्र, विक्षिप्त,स्वतःच्या विश्वात बेधूंद ध्यानं !! हीच हिच्या भावाने लग्न लावून दिल पण लग्नाच्या त्या बंधनाचा तिच्या अस्तिवावर, स्वभावावर, स्वातंत्र्यावर तिळमात्र फरक पडला नाही. परिस्थिती माणसाच मन घडवते आणि एकटेपणा जगाशी लढायची ताकद देते . आयुष्याकडून फारश्या अपेक्षा न ठेवता पुढ्यात आलेलं काम करत जाणे या विचारांची ती ! परिस्थीतीने तिच्यावर अन्याय केला असला तरी कुठलाही मानवी अन्याय तिने कधीच होऊ दिला नाही हेच तिच स्वभावविशेष मला फार आवडते.
आम्ही असहाय्य, अबला म्हणून रडत बसणाऱ्यापेक्षा ती फार पुढे निघून गेलेली होती . कितीही अस्वच्छ , भांडखोर, शिवीगाळ करणारी डोक्यानी हलकी असली तरी तिच्यात स्वतःविषयीचा आत्मविश्वास, लढण्याची ताकद, चार पुरुषांमध्ये चौकात बसून चहा प्यायची धमक होती. फाट्यावर हॉटेल मध्ये जाऊन दररोज मानाने स्वकमाईचा चहा ,कचोरी खाणारी त्याकाळातली बोराखेडितली ती एक सबला होती . अपार कष्ट करून स्वतःच्या नवऱ्याच आणि स्वतःच पोट भरणारी ती एक मानी स्त्री होती आणि आजही आहे.

शिक्षणापासून ,कुटुंबापासून कायमचं वंचित राहिलेली !! माझी आई शिक्षिका असल्यामुळे तुला घरीच शिकवते म्हणून विचारलं तर हीच डोकच थाऱ्यावर नसायचं. त्यामुळे सरस्वती ला तिने तिच्या आसपास पण फिरकू दिल नाही. पैसांचा काय तो हिशोब महत्वाचा बाकी सगळ तिच्या दृष्टीने अर्थहीन !!
मध्यंतरीच्या काळात तिला बरीच मोताळयाची काम मिळाली आणि तिचं वाड्यातल्या कामाकडे दुर्लक्ष होऊ लागल. एकदा भल मोठं भांडण करून तिने तीनही देशपांडे वाड्यातल्या घरावर धिक्कार टाकला . भांडण हा तिच्या व्यक्तिमत्त्वातला विशेष पैलू असल्यामुळे फार कुणी तिला भाव पण नाही दिला. ती वाड्याकडे परत येईलच यावर सगळ्यांचा विश्वास होता. पण अचानक कलाबाई नावाच्या सालस, सुशील , आणि अत्यंत कमी बोलणारया बाई ची एन्ट्री झाली आणि शम्मी च्या दररोजच्या कटकटी पासून सगळ्यांनीच आपली सुटका केली.
शम्मीच्या कानावर ही बातमी पडताच तिचं पित्त अजून खवळलं . जाता येता कलाबाई ला धमक्या आणि समस्त देशपांडेना भर रस्त्यात तिची वायफळ बडबड सुरु झाली. अण्णा गेल्यावर मात्र ती भेटायला आली. तेव्हा तिने अण्णा गेले आता सचमुच का माझा वाड्याशी संबंध संपला अस म्हणून थोडी हळवी होऊन निघून गेली. त्यानंतर काहीदिवासनी करीम खा पण टी बी चा जोर वाढल्यामुळे गेल्याच कळाल . ती औपचारिकतेला फालतू भिक घालत नसल्यामुळे फाट्यावरून गावाकडे येता येताच तिला गाठलं आणि करीम खा चा हळूच विषय काढला.

मी : करीम खा गुजर गया , अच्छा था रे वोह बहूत | तेरा भी बहुत खयाल रखता था |
शम्मी : हा | बहूत खांसी हुई थी | कुछ भी काम नही करता था वोह | दिन भर दवाई और खा खा करता था | मै मेरा काम छोडके थोडे ना उसके पीछे भागू | सपकाळ डाक्तर से दवाई लेकर जाती थी मै | अल्लाह की वजह से अच्छा हुआ | छउट गया बेचारा | पर उसको गरम गरम चाय बहूत पसंद थी | खुद बनाके मुझे भी देता था |
तितक्यात गाव आल आणि ती मस्जीदीच्या दिशेने आणि मी वाड्याकडे वळली . दोन वर्षांपूर्वी बोराखेडीला गेले होते . प्रवास खूप झाल्यामुळे गाढ झोप लागली. सकाळी आठ वाजता भांड्यांचा खडखडाट आणि मोठमोठ्यानी चाललेल्या गप्पांनी जाग आली. अरे शम्मी पुन्हा आली. तशी मी धावतच मागच्या अंगणात गेली. तिने मला बघून कधी आली , कुठे असते, नवरा वागवतोय न चांगला अश्या तिच्या शैलीत स्वागत केल. बऱ्याच गप्पा झाल्यावर तू परत कशी आली विचारलं आणि झाल !! ती तिच्या मूळ अवतारात आली. “मेरे को कोई रोक सकता है क्या ये देशपांडे वाडे मे आने से . अण्णा ने मुझे बोला था तेरा जब जी चाहे तू इधर आ सकती है. मेरे को तो और दस काम मिल रहे थे पर इजू दादा और शोभा वहिनी के लिये आई हू ” .
तिचं ते बोलण एकल आणि इतके दिवस निस्तेज ,ओसाड, निर्मनुष्य पडलेला देशपांडे वाडा आणि त्यात आधुनिक स्थलांतरामुळे पसरलेली भीषण शांतता यांना वाचा फुटली. आज शम्मीची पन्नाशी उलटली आहे. वाड्याबरोबर ती ही वार्धक्याकडे झुकली आहे.वेश आणि वाचा बदल फार नसला तरी शरीर थोड थकल्यासारख भासत .
पूर्वीपासून तिने एकटेपणाच स्वीकारल्यामुळे म्हातारपणाचीहि फार चिंता नाही दिसली चेहऱ्यावर . माझ्या डोक्यात पुढे हीच कोण करेल , ही किती वर्ष असंच काम करत राहील वगैरे विचार सुरु असतानाच तिचे भांडे आटोपून तिने टोपल पायरीवर जोरात आदळल . आणि “ये ऐसे क्यू देख रही रे मेरी तरफ ? ” ……तिने तडक दिशी कुर्त्याच्या खिशातून माझ्या हातात एक फाटक, डागाळलेल , जुन्या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेलं पासबुक ठेवलं. “देख मैने बँक में कीत्ते पैसे जमा किये है !” अस म्हणून तिची ती पाठमोरी आकृती लिंबाच्या झाडा पलीकडून अंधुक झाली . पासबूकावरचा तिचा “तो निळ्या शाईतला अंगठा आणि तिने जमा केलेली रक्कम ” हे बघत बघत शम्मी आणि तिच्या अंतर गाभ्यातलं तिचं विश्व , तिच्या अवकाशाची उंची हे समजून घेण्याचे माझे प्रयत्न फारच तुटपुंजे वाटू लागले………
————————————————————————————————————————————————————————